सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाईची झळ तीव्र होऊ लागली असून, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत टँकर आणि विहीर अधिग्रहणाच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. जिल्हा परिषदेच्या १७ नोव्हेंबर अखेरच्या अधिकृत अहवालानुसार जिल्ह्यात ६६ खासगी आणि ८ शासकीय अशा एकूण ७४ टँकरद्वारे ६६ गावे व ४७९ वाड्यांतील १ लाख ४३ हजार ८८८ नागरिकांना आणि ९७ हजार ४३४ पशुधनाला पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. तसेच टंचाई निवारणासाठी ३० खासगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईची झळ जत तालुक्याला बसली असून, येथील ५७ गावे व ४१४ वाड्यांमधील सुमारे १ लाख २४ हजार ८६७ नागरिक आणि ८१ हजार २२२ पशुधनाला ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये ५७ खासगी व ७ शासकीय टँकरचा समावेश असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात १८ खासगी विहिरी व बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत, तर ४ डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आली आहेत.
आटपाडी तालुक्यातील ७ टंचाईग्रस्त गावे व ५१ वाड्यांमधील १६ हजार ३३२ नागरिकांना आणि १६ हजार २१२ पशुधनाला ८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून येथे ४ विहिरी व बोअर अधिग्रहित केले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील १ गाव व ८ वाड्यांमधील १ हजार ८३४ नागरिकांसाठी १ शासकीय टँकर सुरू करण्यात आला असून २ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
तासगाव तालुक्यातील १ गाव व ६ वाड्यांमधील ८५५ नागरिकांना १ खासगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात असून येथे ३ विहिरी व बोअर अधिग्रहित केले आहेत. याशिवाय खानापूर तालुक्यातील २ गावे टंचाईग्रस्त असून तेथील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ३ खासगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.



