मुंबई (सांगली टुडे वृत्तसेवा): आपल्यापैकी अनेकांच्या घरात जुन्या काळातील एक, दोन किंवा पाच रुपयांची नाणी आणि जुन्या चलनी नोटा जपून ठेवलेल्या असतात. सध्या मोबाईलवर आणि सोशल मीडियावर या जुन्या नोटा व दुर्मिळ नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपये मिळवून देणारे अनेक व्हिडिओ आणि संदेश वेगाने फिरत आहेत.
विशेष म्हणजे, ही जुनी नाणी खरेदी करण्यासाठी बँकांकडून थेट तुमच्या घरी कर्मचारी पाठवले जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अत्यंत महत्त्वाचे नियम स्पष्ट केले असून प्रत्येक सामान्य नागरिकाने ते जाणून घेणे गरजेचे आहे.
जर तुमच्याही मोबाईलवर असा संदेश आला असेल आणि बँक कर्मचारी घरी येऊन जुन्या नोटा विकत घेतील असे वाटत असेल, तर सर्वात आधी रिझर्व्ह बँकेचे नियम समजून घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, बँक कोणत्याही प्रकारच्या जुन्या नोटा आणि दुर्मिळ नाण्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करत नाही.
त्यामुळे कोणत्याही बँकेचा कर्मचारी घरोघरी येऊन जुनी नाणी किंवा नोटा विकत घेत नाही. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयानेही यासंदर्भात अधिकृत माहिती जारी करून नागरिकांना सावध केले आहे.
अनेक नागरिकांना वाटते की रिझर्व्ह बँकेने एखाद्या खाजगी एजंटला किंवा कंपनीला जुन्या नोटा गोळा करण्याचे कंत्राट दिले असेल. यावरही प्रशासनाने पडदा टाकला असून, जुन्या नोटा व नाण्यांच्या खरेदी-विक्रीसाठी कोणत्याही संस्था, कंपनी किंवा व्यक्तीला बँकेने आपल्या वतीने शुल्क किंवा कमिशन गोळा करण्याचे अधिकार दिलेले नाहीत.
सध्या सायबर ठगांकडून नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे नाव आणि अधिकृत लोगो वापरून बनावट जाहिराती तयार केल्या जात आहेत. या जाहिरातींना भुलून नागरिकांनी फोन केल्यास त्यांच्याकडून नोंदणी शुल्क, प्रक्रिया शुल्क किंवा कराच्या नावाखाली पैसे उकळले जातात आणि बँक खात्याची माहिती घेऊन आर्थिक फसवणूक केली जाते.
त्यामुळे घरातील जुन्या नोटा किंवा नाणी विकण्याच्या मोहापायी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोनवर आपली वैयक्तिक माहिती, बँक तपशील किंवा पैसे देऊ नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरील अशा संदिग्ध संदेशांपासून स्वतःबरोबरच घरातील वडीलधाऱ्यांनाही सावध ठेवणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
📢 बँकिंग नियम, महत्त्वाचे शासन निर्णय (GR) आणि जनहिताच्या उपयुक्त बातम्या सोप्या मराठी भाषेत वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇



