सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): दुष्काळी अशी ओळख असलेल्या जत तालुक्यातील धार्मिक आणि निसर्ग पर्यटनाला आता मोठी चालना मिळणार आहे. तालुक्यातील चार प्रमुख देवस्थान परिसरातील वनउद्यान निसर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी एकूण ४२ कोटी ५६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला राज्य शासनाच्या महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने तत्वतः मंजुरी दिली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून, वन विभागांतर्गत महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सन २०२६-२७ ते २०२८-२९ या तीन वर्षांच्या कालावधीत ही विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत.
कोणत्या चार देवस्थान परिसराचा होणार विकास?
या मंजूर आराखड्यात जत तालुक्यातील चार महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मौजे वळसंग येथील श्री संगतीर्थ दानम्मा देवी मंदिर वनउद्यानासाठी सर्वाधिक १४ कोटी ३३ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
तसेच मौजे गिरगाव येथील श्री लक्ष्मी देवी मंदिर वनउद्यानासाठी १० कोटी ८१ लाख रुपये आणि मौजे मोटेवाडी येथील श्री मरगुबाई देवी मंदिर वनउद्यानासाठी ८ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय जत शहरातील श्री अंबाबाई देवी मंदिर वनउद्यान विकासासाठी ८ कोटी ६० लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता मिळाली आहे.
हेही वाचा: तासगावच्या कवठेएकंदमध्ये मध्यरात्री थरार; गॅस कटरच्या सहाय्याने एसबीआयचे एटीएम फोडून पाच लाखांची रोकड लंपास.
पर्यटकांसाठी काय सुविधा उभारल्या जाणार आणि रोजगार कसा मिळेल?
या प्रकल्पांच्या माध्यमातून केवळ मंदिरांचा परिसरच नव्हे, तर संपूर्ण वनपरिसराचा पर्यावरणपूरक विकास केला जाणार आहे. या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले आधुनिक निर्वचन केंद्र, शालेय विद्यार्थ्यांसाठी निसर्ग शिक्षण आणि कॅम्पिंग साईट उभारली जाईल. पर्यटकांच्या निवासासाठी बांबू व लाकडाचे नैसर्गिक टेंट, ॲम्पीथियेटर, पर्यावरणपूरक पाथवे, नक्षत्र वन आणि बेल वन अशी आकर्षक कामे साकारली जाणार आहेत.
या सर्व कामांची अंमलबजावणी संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि स्थानिक गावकऱ्यांच्या सहभागातून होणार असल्याने परिसरातील तरुणांना व स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
📢 सांगली जिल्हा आणि जत तालुक्यातील विकासकामे, शासकीय निधी आणि ताज्या स्थानिक घडामोडी सर्वात आधी वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇



