सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): आगामी उन्हाळा आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून चारा बियाणे वाटप आणि हिरवा चारा निर्मितीचा आराखडा राबवला जात आहे.
जिल्ह्याला मका चारा बियाणे वाटपासाठी दोन कोटी रुपयांचा जादा निधी मिळाला असून त्यातून ५ हजार ४१५ पशुपालकांना बियाणे दिले जात आहे. याशिवाय जिल्हा वार्षिक योजनेतील तीन कोटी रुपयांतून सुमारे १९ हजार शेतकऱ्यांना बियाणे देऊन जवळपास पाच हजार हेक्टरवर चारा पिकांची लागवड करण्यात आली आहे.
सिंचनाची सोय असलेल्या शेतात पिकवणार हिरवा चारा
जिल्ह्यातील ज्या ८ हजार ६७२ शेतकऱ्यांकडे पाण्याची आणि सिंचनाची सोय आहे, त्यांच्या शेतातील आठ हजार एकरहून अधिक जागेवर रब्बी व उन्हाळी हंगामात हिरवा चारा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हिरवा चारा खराब होऊ नये आणि टंचाईच्या काळात वापरता यावा, यासाठी जिल्ह्यातील आठ मुरघास प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे ८०० मेट्रिक टन चारा साठवला जाणार आहे.
त्याचबरोबर रांजणी येथील शेळी-मेंढी विकास प्रक्षेत्रावर ६० हेक्टर आणि जत येथील पशुपैदास प्रक्षेत्रावर ३० हेक्टर जमिनीवर चारा लागवड केली जात आहे. या कामासाठी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीची मदत घेतली जात असून यातून पाच हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे.
ऊस तोडणी मजुरांकडून करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस क्षेत्र असल्याने त्यातून सुमारे साडेआठ लाख मेट्रिक टन उसाचे वाडे मिळू शकतात. ऊस तोडणी मशीनऐवजी मजुरांमार्फत केल्यास शेतात उसाचे वाडे शिल्लक राहतील आणि त्यांचा जनावरांसाठी चारा म्हणून उत्तम वापर करता येईल. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी साखर कारखानदारांची बैठक घेऊन विशेष आवाहन केले आहे.
याशिवाय वनक्षेत्र, गायरान आणि इतर पिकांच्या अवशेषांचाही चारा म्हणून वापर केला जाणार आहे. चारा टंचाईच्या काळात हायड्रोफोनिक चारा आणि अझोला निर्मितीबाबत गावागावांत जनजागृती केली जात असून जनावरांसाठी मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिरेही आयोजित केली जात आहेत.
📢 सांगली जिल्ह्यातील शेतकरी योजना, कृषी सल्ला, हवामान अंदाज आणि जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे निर्णय सर्वात आधी वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇



