Sangli Today | आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्णायक विजय मिळवत सत्तेवर आपली पकड मजबूत केली आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपचे यु. टी. जाधव यांनी विजय मिळवत आटपाडीच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे.
या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रभावी संघटन आणि रणनीती दाखवली. शिवसेना (शिंदे गट) आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीला या निकालातून मोठा धक्का बसला आहे.
17 प्रभागांत रंगलेली चुरस
१७ प्रभागांच्या नगरपंचायतीत शिवसेना (शिंदे गट) ने ८ जागा मिळवत संख्याबळ दाखवले, तर भाजपने ७ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. मात्र नगराध्यक्षपद भाजपकडे गेल्याने सत्ताकेंद्र भाजपकडे सरकले आहे.
कोणाला कुठे यश?
शिवसेनेने प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ५, ८, ९ आणि १६ मध्ये विजय मिळवला. भाजपने ६, ७, १०, ११, १२, १३ आणि १५ या प्रभागांमध्ये बाजी मारली. राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रभाग १४, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीने प्रभाग १७ जिंकला.
मताधिक्याचे चित्र
प्रभाग १६ मध्ये शिवसेनेचे बाळासो हजारे यांनी तब्बल ६९१ मतांनी मोठा विजय मिळवला, तर प्रभाग १७ मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मीनाक्षी पाटील यांना केवळ ३ मतांच्या फरकाने विजय मिळाला.
मतमोजणी शांततेत, उत्साहात जल्लोष
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शीतल बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. अवघ्या दीड तासांत निकाल जाहीर झाले. निकाल लागताच आटपाडी शहरात फटाके, मिरवणुका आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
पहिल्याच निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपद जिंकत सत्ता मिळवल्याने, आटपाडीच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
हेही वाचा : उरण ईश्वरपूर नगरपरिषद निकाल – 23 जागांसह जयंत पाटील गटाची एकहाती सत्ता कायम.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










