Sangli News | सांगली : सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळणार आहे. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन आठ दिवसांत संयुक्त पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यांनी स्पष्ट केले की, बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई जमा होईल यासाठी सर्व संबंधित विभागांनी संवेदनशीलतेने व गतीने काम करावे.
बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, तसेच कृषी, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे व पुरवठा विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पिकांव्यतिरिक्त इतर झालेल्या नुकसानीसाठीही पंचनाम्यानुसार निधीचे वाटप तातडीने करण्यात यावे.”
या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार आहे.