सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून विजय मिळवत वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी नगरसेवक होण्याचा मान पटकावला आहे. ही त्यांच्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक असून, पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या यशामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात त्यांची विशेष चर्चा होत आहे.
हर्षवर्धन पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव आणि खासदार विशाल पाटील यांचे पुतणे आहेत. मोठा राजकीय वारसा असला तरी, नगरसेवक पदासाठी पहिल्याच निवडणुकीत थेट जनतेचा कौल मिळवणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे यश मानले जात आहे.
निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, “ही माझ्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक होती. प्रभाग क्र. 11 मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले, याचे श्रेय मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला जाते. आम्ही गेल्या काही महिन्यांत लोकांशी थेट संपर्क साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.”
ते पुढे म्हणाले की, प्रचारादरम्यान काही अडचणी आणि दबाव जाणवला असला तरी निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला होता. “तरुणांना व्यसनांच्या आहारी जाण्यापासून रोखणे, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे यावर माझा भर राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी पाच वर्षांतील कामांबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, प्रभागातील रस्ते, गटारी यांसारखी मूलभूत कामे झाली असली तरी स्वच्छता, ओपन स्पेस डेव्हलपमेंट, तरुणांचा रोजगार आणि लहान मुलांच्या शिक्षणाशी संबंधित विषयांवर विशेष लक्ष दिले जाईल. तसेच, प्रभागावर लागलेला गुन्हेगारीचा ठपका दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत कुटुंबीयांचे मार्गदर्शन व सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे सांगत त्यांनी मतदारांचे आभार मानले. कमी वयात मिळालेल्या या जबाबदारीकडे नव्या नेतृत्वाच्या दृष्टीने पाहिले जात असून, आगामी काळात त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
हेही वाचा: सांगली महापालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी; नव्या नगरसेवकांमध्ये 34 महिला नगरसेवक.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









