Jat News Today | जत (सांगली): जत तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी थेट माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांना भेटून आपली व्यथा मांडली. विक्रमसिंह सावंत यांनी शेतकऱ्यांची समस्या गांभीर्याने घेत प्रशासनाकडे त्वरित मदतीची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवरचे आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे. बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी थेट विक्रमसिंह सावंत यांच्या समोर मांडल्या. यानंतर सावंत यांनी शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी याबाबत उपविभाग कार्यालय जत येथे निवेदन दिले.
मा आमदार सावंत म्हणाले की, “शेतकऱ्यांची अवस्था गंभीर आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई न दिल्यास शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आमदार जयंत पाटील यांनी, राज्यात गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून यावर उपाय म्हणून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

हेही वाचा: सांगलीत 28 सप्टेंबर रोजी ‘नमो रन मॅरेथॉन 2025’.