Jath : जतपूर्व भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Jath Rain Crop Damage Sangli

Sangli Rain News | जत : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जतपूर्व भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत असून, शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका भुईमूग, बाजरी, तूर, उडीद तसेच द्राक्ष, डाळिंब, पेरू अशा फळबागांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी उसाच्या शेतात पाणी साचल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

माडग्याळ, तिकोंडी, उमदी, सोनलगी, बोर्गी बुद्रुक-खुर्द, हळ्ळी, बालगाव, माणिकनाळ, अक्कळवाडी, गिरगाव, जालीहाळ यासह बोर नदी परिसरात पिकांचे, घरांचे आणि रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी द्राक्षबागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. सुपीक जमीन वाहून गेल्याने उत्पादनावरही दीर्घकालीन परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

अनेक गावांमध्ये घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अक्कळवाडी, मोरबगी, हळ्ळी या ठिकाणी तब्बल दोनशे घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. परिणामी उघड्यावर संसार सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना तातडीची मदत कधी मिळणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. स्थानिक नागरिक मात्र शासनाने लवकरात लवकर भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करत आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विक्रमसिंह सावंत व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विक्रमसिंह सावंत व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. (Photo Courtesy: X)

हेही वाचा: सांगलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शेतपिकांचे मोठे नुकसान.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.