Sangli Rain Update | सांगली : जिल्ह्यात काल (26 सप्टेंबर) दुपारपासून सुरु झालेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. मिरज, कुपवाड आणि सांगली शहरात रात्रभर पाऊस सुरू राहिला. सकाळी काहीसा कमी-जास्त झाला असला तरी पावसाचा जोर कायम आहे.
या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, भुईमूग व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच केळी, डाळिंब व द्राक्षासारख्या फळबागांमध्येही पाणी साचले आहे. विशेषत: मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यात लवकर छाटणी केलेल्या द्राक्ष बागांवर दावण्या व करप्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ग्रामीण भागात शेतजमिनींमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदली गेली असून, काही ठिकाणी 90 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खानापूर घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे अग्रणी नदी दुथडी भरून वाहत आहे. परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत असल्याने गावोगावी नागरिक चिंतेत आहेत.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी अजून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: कोयना धरणातून विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.