सांगली : राज्यात गुटखा, सुगंधी तंबाखू व प्रतिबंधित अंमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कठोर भूमिका घेण्यात आली असून, बंदी असलेल्या एखाद्या कार्यक्षेत्रात गुटखा अथवा तत्सम पदार्थ आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात यापूर्वीच जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निर्देशानंतर विभागाकडून राज्यभर परिपत्रक जारी करण्यात आले असून, प्रतिबंधित गुटखा, तंबाखू किंवा अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक आढळल्यास केवळ विक्रेत्यांवरच नव्हे तर संबंधित क्षेत्रातील जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. यानुसार अन्न सुरक्षा आयुक्तांनी सर्व विभागीय सहआयुक्तांना अवैध विक्रीविरोधात प्रभावी तपास व कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात 20 डिसेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सुगंधी सुपारी, तंबाखू व मावा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. पान टपऱ्यांवर होणारी अवैध विक्री थांबवणे, तसेच तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यावरही त्यांनी भर दिला होता.
या बैठकीला अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग तसेच अन्य संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून तपास मोहीम राबवण्याचे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले होते.
राज्यस्तरीय कठोर कारवाईचा आदेश आणि सांगली जिल्ह्यातील आधीच्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर, येत्या काळात जिल्ह्यात गुटखा व तंबाखूविरोधी कारवाई अधिक तीव्र होणार हे निश्चित.
हेही वाचा: सांगलीत जनतेच्या संपर्कात असलेल्यालाच उमेदवारी – आमदार विश्वजित कदम.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










