सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणूक शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेच्या वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर संघटित गुन्हेगारी आणि सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली असून, सांगली व मिरज परिसरातील दोन टोळ्यांतील 16 संशयित गुन्हेगारांविरोधात ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मोक्का) अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत वारंवार गुन्हे दाखल असलेल्या तसेच निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकणाऱ्या सुमारे 1500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये नोटिसा, तडीपारी, बंधपत्रे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
365 शस्त्र परवाने रद्द
निवडणूक काळात शस्त्रांचा गैरवापर होऊ नये यासाठी जिल्ह्यातील 365 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मृत व्यक्तींच्या नावावरील परवाने तसेच शारीरिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींच्या परवान्यांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी आणि अतिरिक्त बंदोबस्त
महापालिका क्षेत्रात निवडणूक काळात कोंबिंग ऑपरेशन, ठिकठिकाणी नाकाबंदी, तसेच संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी राज्य राखीव पोलिस दल (SRPF) तैनात करण्यात येणार असून, परजिल्ह्यातून सुमारे 700 होमगार्ड सांगलीत दाखल होणार आहेत.
याशिवाय, जिल्ह्यात 14 पोलिस निरीक्षक, 70 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, तसेच 1110 पोलिस अंमलदारांचा निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत.
मोक्का प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे
संघटित गुन्हेगारी संदर्भातील ‘मोक्का’चा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया त्यांच्या मान्यतेनंतर राबवली जाणार आहे.
निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षकांकडून करण्यात आले आहे.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










