ईश्वरपूर : कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार ईश्वरपूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी कारागृह पोलिस हवालदारासह त्याच्या तीन नातेवाईकांविरुद्ध ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अर्जुन आण्णासाहेब देशमुख (रा. विष्णुनगर, कापूरवाडी–पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संशयित बाजीराव जोती पाटील (कारागृह पोलिस हवालदार, मूळ रा. वाडीभाग, ता. शिराळा; सध्या रा. विसापूर, जि. अहिल्यानगर) यांनी स्वतःची कारागृह विभागात ओळख असून वरपर्यंत संपर्क असल्याचा दावा करत फिर्यादींच्या मुलाला वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव पाटील याने नोकरी लावण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली. या आमिषाला बळी पडून अर्जुन देशमुख यांनी पतसंस्थेतून कर्ज काढून फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत संशयितांच्या बँक खात्यावर तसेच रोख स्वरूपात रक्कम दिली. काही कालावधी उलटूनही नोकरी न मिळाल्याने पैसे परत मागितले असता, संशयिताने दिलेला १५ लाख रुपयांचा धनादेश बँकेत वटला नाही.
या प्रकरणात बाजीराव पाटील याच्यासह गणेश दिनकर जाधव, नागेश दिनकर जाधव आणि मनिषा गणेश जाधव (सर्व रा. पाचगाव, जि. कोल्हापूर) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे.
हेही वाचा: कवलापूरमधील जबरी चोरीचा छडा; दोन तरुणांना अटक.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










