सांगली : मराठा समाजातील तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत वेळ न घालवता स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. या स्वावलंबनाच्या प्रवासाला बळ देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ भक्कम आधार देत असून, मागील सात वर्षांत जिल्ह्यात तब्बल ९ हजार १०१ तरुणांना ९१८ कोटी ५४ लाख रुपयांचे बँक कर्ज मंजूर झाले आहे.
या लाभार्थ्यांपैकी ८ हजार ३१२ जणांना ८८ कोटी ९३ लाख रुपयांचा व्याज परतावा अनुदान म्हणून मिळाला आहे. म्हणजेच, तरुणांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची रक्कम बँकेत जमा केल्यानंतर तीच रक्कम परत अनुदान स्वरूपात महामंडळाकडून मिळत आहे. ही योजना बिनव्याजी कर्जासारखीच ठरत असून, नवउद्योजकांसाठी मोठा दिलासा आहे.
२०२५-२६ साठी ७५० कोटींचा निधी
चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) राज्य शासनाने महामंडळाला तब्बल ७५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापैकी ३०० कोटी थेट महामंडळाकडे वर्ग झाले आहेत. यामुळे विविध योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळणार असून, अधिकाधिक तरुणांना कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ घेता येणार आहे.
स्वावलंबनाची नवी दारे
२०१८ ते २०२५ या कालावधीत मंजूर झालेल्या कर्जामुळे सांगलीतील अनेक तरुणांनी स्वतःचे उद्योग-व्यवसाय उभे केले आहेत. ड्रॅगनफ्रूट, डाळिंब, डेअरी, सेवा व्यवसाय, लघुउद्योग अशा विविध क्षेत्रात नवउद्योजक पुढे येत आहेत.
नागरिकांना सूचना
या योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. एजंटांच्या भूलथापांना बळी न पडता अधिकृत पोर्टलवर उपलब्ध माहिती व व्हिडीओंच्या मदतीने अर्ज करावा.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यातील २५ टक्के तर राज्यभरातील दीड कोटी लाडक्या बहिणी अपात्र? व्हायरल मेसेजमागच सत्य काय.