सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात संभाव्य समन्वयाबाबत चर्चांना वेग आला असून, एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
गेल्या चोवीस तासांपासून सांगलीत मुक्काम ठोकून असलेले मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध गटांतील प्रमुख नेत्यांमध्ये सातत्याने बैठका सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या चर्चांमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, निशिकांत पाटील तसेच आमदार इद्रिस नायकवडी यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, काल रात्री उशिरा माजी मंत्री जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत अज्ञातस्थळी बैठक घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या बैठकीत महापालिकेतील प्रभागनिहाय उमेदवारांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ७८ प्रभागांपैकी जवळपास ३० जागांवर काल रात्रीपर्यंत प्राथमिक एकमत झाले असून, उर्वरित जागांवरही समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व घटक पक्षांनी आपापली ताकद एकत्र करून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने हालचाली वाढवल्या असल्याचे संकेत मिळत आहेत.
या संभाव्य युतीमुळे सांगली महापालिकेतील सत्ता गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काही दिवसांत याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा: सांगली महापालिकेत भाजप ७२ जागा लढवणार? उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब, आज एबी फॉर्म देण्याची शक्यता.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










