Sangli Rain Today: सांगली शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हाहाकार माजवला आहे. काल दुपारपासून सुरु झालेला पाऊस दुसरा दिवस उजाडला तरी देखील सुरूच आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी सांगली जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला असून पुढच्या तीन दिवसात जिल्ह्यातील काही भागात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काढणीला आलेले सोयाबीन, कडधान्य आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मे पासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतीला सतत फटका बसत असून, ऑगस्टमध्ये तर पुरस्थिती निर्माण झाली होती.
गेल्या आठ-दहा दिवसांत पावसाला उघडीप मिळाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीकामाला गती दिली होती. मात्र, काल सुरु झालेल्या पावसामुळे पुन्हा शेतकरी हवालदिल झाले आहेत. हवेत गारवा पसरला असून सध्या सुरु असलेल्या द्राक्षछाटणी हंगामावरही याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले असून, “जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाने अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.”
पुलांची पाणी पातळी (27 सप्टेंबर सकाळी 7.30 वा.)
- बहे पूल: 05.03 फूट (धोका पातळी 23.7 फूट)
- ताकारी पूल: 10.08 फूट (धोका पातळी 46 फूट)
- भिलवडी पूल: 11.02 फूट (धोका पातळी 53 फूट)
- आत्यर्विन पूल: 11.07 फूट (धोका पातळी 45 फूट)
हेही वाचा: जतपूर्व भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.