Sangli Rain Update | सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस शनिवारी संध्याकाळपर्यंत सुरु राहिल्याने शहरासह मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. मुसळधार पावसाने ग्रामीण भागासह सांगली शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत.
अग्रणी, माणगंगा, येरळा नद्या तसेच ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील तब्बल 40 हून अधिक रस्ते व पूल पाण्याखाली गेले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, कडधान्य, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष छाटणीच्या हंगामावरही पावसाचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
नवीन अपडेट (दि. 28 सप्टेंबर, सकाळी 9.55 वाजता):
सांगली आयर्विन पूल येथे पाण्याची पातळी 20.11 फूट नोंदवली गेली आहे, तर मिरज कृष्णा घाट येथे पातळी 30.5 फूट झाली आहे. कोयना धरणातून 20,000 क्युसेक आणि चांदोली धरणातून 5,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पुढील दोन दिवसांपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनावश्यक प्रवास न करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय पावसाची नोंद (28 सप्टेंबर 2025):
- जत-
- वाळवा-26
- तासगाव-53
- शिराळा-36
- आटपाडी-41
- कडेगाव-42
- कवठेमहांकाळ-42
- पलूस-18
- कसबेडीग्रज-२०.२
- मिरज-31
- कोकरूड-38
- संख-10
हेही वाचा: पलूसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जबरदस्ती विवाह आणि जातीवाचक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघड.