सांगली : सांगली शहर आणि सांगलीवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या भीतीने ज्येष्ठ नागरिकांना सकाळचा फेरफटका टाळावा लागतो, तर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप सांगलीवाडीतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नुतन नगरसेवक अभिजीत कोळी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका अश्विनी चेतन कदम यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नूतन नगरसेवक अभिजीत कोळी यांनी महापालिका प्रशासनावर थेट टीका केली. “महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून संजयनगर, १०० फुटी रस्ता, कोल्हापूर रोड परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे एका बालकाला जीव गमवावा लागला होता. मात्र तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आली नाही,” असे ते म्हणाले.
भटक्या कुत्र्यांची नसबंदी (ABC) मोहीम कागदावरच राहिल्याचा आरोप करत कोळी म्हणाले, “जर १५ दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास महापालिकेच्या आवारात भटकी कुत्री आणून सोडून जनआंदोलन उभे करू. वेळ पडल्यास न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करू.”
काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनीही भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी केली. “हा केवळ एका प्रभागाचा नाही, तर संपूर्ण सांगली शहराचा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणावर एकाचवेळी नसबंदी मोहीम राबवली पाहिजे. वारंवार त्याच कुत्र्यांची कागदावर नसबंदी दाखवून मोहीम रबावल्याचा प्रकार थांबला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
नसबंदी झालेल्या कुत्र्यांना योग्य ओळख क्रमांक व टॅग लावण्याची आवश्यकता असल्याचेही त्या म्हणाल्या. “भटकी कुत्री मुका जीव आहेत, पण नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत यावर ठोस उपाययोजना व्हायला हव्यात,” असे कदम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नवनिर्वाचित नगरसेवकांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने झालेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










