सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): शासकीय कामांसाठी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे वाचवण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या ऑनलाईन ‘फेसलेस’ (Faceless) सेवांना सांगली जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. चालू वर्षात सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ‘वाहन’ आणि ‘सारथी’ या दोन्ही ऑनलाईन प्रणालींद्वारे तब्बल २१ हजार ९६४ नागरिकांनी आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष न जाता घरबसल्या विविध दाखले आणि परवान्यांचा लाभ घेतला आहे. यामध्ये वाहन प्रणालीवरील १६ हजार ४१४, तर सारथी प्रणालीवरील ५ हजार ५५० लाभार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली.
हेही वाचा: आता एजंटशिवाय घरबसल्या काढा ड्रायव्हिंग लायसन्स; ‘आपले सरकार’ने जाहीर केले अधिकृत दर आणि कागदपत्रांची यादी.
‘वाहन’ प्रणालीद्वारे १६,४१४ नागरिकांची कामे पूर्ण
परिवहन विभागाच्या vahan.parivahan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून वाहनांशी संबंधित विविध फेसलेस सेवांचा १६ हजार ४१४ नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील सेवांचा समावेश आहे:
- विशेष परवाना (Special Permit): १२,१९४ लाभार्थी
- परवाना नूतनीकरण (Permit Renewal): १,७६७ लाभार्थी
- वाहन तपशील माहिती: १,५७८ लाभार्थी
- वाहन हस्तांतरण (Ownership Transfer): ८७१ लाभार्थी
- नोंदणी रद्द करणे (RC Cancellation): १९५ लाभार्थी
- ना-हरकत प्रमाणपत्र (NOC): ०९ लाभार्थी
‘सारथी’ प्रणालीतून ५,०९३ जणांनी काढले घरबसल्या लर्निंग लायसन्स
चालक परवान्याशी संबंधित sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून ५ हजार ५५० नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे:
- शिकाऊ अनुज्ञप्ती (Learning License): ५,०९३ लाभार्थी
- दुय्यम अनुज्ञप्ती प्रत (Duplicate License): १५७ लाभार्थी
- लायसन्सवरील नावात बदल: १३१ लाभार्थी
- लायसन्स नूतनीकरण (Renewal): ९५ लाभार्थी
- पत्ता बदलणे: ४४ लाभार्थी
- फोटो व सही बदलणे: १५ लाभार्थी
- अनुज्ञप्ती तपशील व पुनर्निर्गमन: १५ लाभार्थी
वेळ आणि पैशांची बचत
या फेसलेस सेवांमुळे नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरणे, शुल्क जमा करणे आणि अर्जाची स्थिती तपासणे घरबसल्या शक्य झाले आहे. परिणामी एजंटांचा त्रास आणि कार्यालयातील गर्दी कमी होऊन नागरिकांच्या वेळेची व पैशांची बचत होत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी पारदर्शक व गतिमान असलेल्या या ऑनलाईन सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले आहे.
📢 सांगली जिल्ह्यातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), हवामान अंदाज, शेतमाल बाजारभाव आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



