सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना दुर्धर आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचारांसाठी तात्काळ आर्थिक मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ (CMRF) कक्षाची संपूर्ण कार्यपद्धती आता नवीन पेपरलेस ऑनलाइन प्रणालीवर आणली आहे. या महत्त्वपूर्ण सुधारणेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मंत्रालयाचे किंवा सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची गरज उरलेली नसून, रुग्णालयात आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर संबंधित रुग्णालयामार्फतच ऑनलाइन अर्ज दाखल केला जाणार आहे. विशेष म्हणजे, अर्ज सादर झाल्यानंतर अवघ्या ८ तासांत अर्जाची ऑनलाइन पडताळणी होऊन मंजुरी मिळणार असून, मंजूर रकमेपैकी ३० टक्के निधी लगेचच डीबीटीद्वारे रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत राज्यातील २० गंभीर व दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी पात्र रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. नवीन डिजिटल प्रणालीमध्ये अर्जदारांना अर्जाची सद्यस्थिती घरबसल्या एसएमएसद्वारे (SMS) आणि मोबाईल ॲपवर तपासता येणार आहे. या प्रक्रियेवर थेट देखरेख ठेवण्यासाठी मंत्रालय वॉर रूम कार्यरत करण्यात आली असून, रुग्णालयांमधील रिअल टाइम बेड व्यवस्थापनाची सुविधा तसेच सीएसआर (CSR) आणि स्वयंसेवी संस्थांची भागीदारीही या प्रणालीशी जोडण्यात आली आहे.
वैद्यकीय मदतीसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय अर्थसहाय्य मिळवण्यासाठी कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षाचे सर्व स्रोतांचे मिळून वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, त्यासाठी तहसीलदारांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला जोडावा लागतो. याशिवाय रुग्णाचे महाराष्ट्र राज्यातील रेशनकार्ड, रहिवासी दाखला किंवा आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आमदार किंवा खासदारांचे शिफारस पत्र सादर करणे बंधनकारक आहे.
संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असून, खाजगी रुग्णालयात उपचाराचा खर्च १ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक किंवा जिल्हा शल्य चिकित्सकांनी ते प्रमाणित करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णालय शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट असूनही संबंधित रुग्णाला त्या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे प्रमाणपत्रावर नमूद करावे लागते. प्रत्येक रुग्णाला तीन वर्षांतून एकदाच या निधीतून आर्थिक सहाय्य दिले जाते आणि मंजूर झालेली सर्व रक्कम थेट संबंधित रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केली जाते.
मदत आणि अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक
गरजू रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना अर्ज प्रक्रियेबाबत काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास राज्य शासनाने १८००१२३२२११ हा टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तसेच पात्र रुग्णालये आणि नागरिकांना अधिक तपशीलासाठी cmrf.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येणार आहे.
📢 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेसह महाराष्ट्रातील ईतर शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



