सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील वर्दळीच्या एसटी स्टँड परिसरात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी लक्ष्य केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
अज्ञात चोरट्यांनी गॅस कटर आणि इतर हत्यारांचा वापर करून एटीएम मशीन कापले आणि त्यातील सुमारे पाच लाख रुपयांची रोकड लंपास केली. बुधवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला असून, गुरुवारी दुपारी ही चोरी उघडकीस आली.
कवठेएकंद एसटी स्टँड परिसरात नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच या एटीएम सेंटरचे शटर खाली ओढलेले होते. शटर बंद असल्यामुळे नेमके काय घडले आहे, याचा कोणालाही अंदाज आला नाही.
अखेर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक ग्राहक पैसे काढण्यासाठी तिथे आला असता, शटर उघडल्यानंतर एटीएमची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने तासगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून तासगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच तज्ज्ञ पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले.
घटनास्थळावरून बोटांचे ठसे व इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा माग काढत आहेत. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
📢 सांगली जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



