सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सध्याच्या पुणे-बंगळूर (कोल्हापूर-बेळगाव मार्गे) राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी, अपघात आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या महापुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित नवा पुणे-बंगळूर ‘ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे’ (Pune-Bengaluru Greenfield Expressway) आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. केंद्र सरकारच्या ‘भारतमाला व्हिजन २०४७’ मास्टर प्लॅनअंतर्गत विकसित होणाऱ्या या महत्त्वाकांक्षी महामार्गाचा प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाला असून, केंद्रीय कॅबिनेटच्या अंतिम आर्थिक मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.
५० हजार कोटींचा प्रकल्प आणि २१ हजार एकर भूसंपादन
या नव्या महामार्गामुळे पुणे ते बंगळूर हा प्रवास अवघ्या ७ ते ८ तासांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ७०० किलोमीटरहून अधिक लांबीच्या या प्रकल्पासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, महाराष्ट्रातील ३ जिल्हे आणि कर्नाटकातील ९ जिल्हे अशा एकूण १२ जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे. यासाठी २१ हजार एकरपेक्षा जास्त जमीन संपादित केली जाणार असून, भूसंपादन व पर्यावरण विभागाच्या मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यांतून जाणार महामार्ग
नव्या पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेची सुरुवात पुणे जिल्ह्यातील वर्वे कंजाळे येथून होणार आहे. पुढे भोर आणि पुरंदर तालुक्यांतून निरा नदी ओलांडून हा मार्ग सातारा जिल्ह्यातील खंडाळा (पारगाव), फलटण, माण आणि खटाव तालुक्यांतून सांगली जिल्ह्यात प्रवेश करेल. विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी व कोरडवाहू पट्ट्यातील खानापूर (विटा), तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज (महाराष्ट्र हद्दीपर्यंत) या चार तालुक्यांतून हा महामार्ग पुढे जाणार असल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागातील विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
कर्नाटकातील प्रमुख मार्ग (रूट)
मिरज तालुक्यातून पुढे कर्नाटकात प्रवेश केल्यानंतर हा महामार्ग बेळगाव, अथणी, रामदुर्ग, बागलकोट-जमखंडी, मुधोळ, गदग-नरगुंद, कोप्पळ-यलबर्गा, ककनूर, विजयनगर-होसपेट, कुरीर्गी, दावणगिरे-जगलूर, चित्रदुर्ग, तुमकूर-सिरा, मधुगिरी आणि कोर्टागिरी मार्गे बंगळूर (ग्रामीण) येथील डोड्डाबळ्ळापूर व नेलमंगला येथून पुढे बंगळूरच्या सॅटेलाईट रिंग रोडला जोडला जाणार आहे.
📢 सांगली जिल्ह्यातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), हवामान अंदाज, शेतमाल बाजारभाव आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



