सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): “दीडशे कोटी रुपये किमतीच्या साखर कारखान्याला साडेतीनशे कोटींचे कर्ज द्यायचे आणि पुन्हा ओटीएस (OTS) योजनेखाली ते माफ करायचे, हा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही. कारखानदारांना वाटलेले ३,५०० कोटी रुपये, डुप्लिकेट सोन्यावरील कर्जाच्या सर्व फाईल्स तसेच प्रत्यक्ष गोडाऊनमधील साखरेच्या साठ्याची तपासणी करण्याची मागणी बँकेकडे केली आहे,” असा थेट इशारा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिला.
भाजप विटा शहर मंडल अध्यक्षपदी प्रशांत आप्पा कांबळे यांची निवड झाल्याबद्दल तसेच जत मतदारसंघातून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल खानापूर तालुका भाजपच्या वतीने विटा येथे आयोजित भव्य सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
टेंभू, म्हैसाळ आणि जत सिंचनासाठी कोट्यवधींचा निधी
यावेळी बोलताना आमदार पडळकर यांनी दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्पांसाठी राज्य सरकारने दिलेल्या निधीचा सविस्तर तपशील मांडला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधावर जाऊन ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली. राज्यातील शेतकऱ्यांचे ५० हजार कोटींचे वीजबिल माफ करून दिवसा वीज उपलब्ध करून दिली आहे.
सिंचन योजनांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जत सिंचन योजनेसाठी २,००० कोटी रुपये, टेंभू योजनेसाठी ७,००० कोटी रुपये आणि म्हैसाळ सोलार प्रकल्पासाठी १,८०० कोटी रुपये सरकारने दिले आहेत. कोयना धरणात पाणीसाठा कमी असल्याने टेंभूचे पाणी शेतकऱ्यांनी जपून वापरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
१८ महामंडळांमधून तरुणांना उद्योग कर्ज खुले करणार
एकाच कारखान्याला ५०० कोटी रुपये देण्याऐवजी अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, महात्मा बसवेश्वर महामंडळ, राजे उमाजी नाईक महामंडळ आणि बारा बलुतेदारांच्या सर्व १८ महामंडळांमधून तरुणांना उद्योगासाठी बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना कोणताही संचालक शिफारस देत नाही, त्यांच्यासाठी आपण स्वतः जिल्हा बँकेत स्वतंत्र ऑफिस सुरू करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. खानापूर व आटपाडीतील कार्यकर्त्यांनी कोणताही न्यूनगंड न ठेवता जनतेची कामे हातात घ्यावीत, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, अशोक गायकवाड, वैभव पाटील, विलास काळेबाग, दाजी शेठ, संग्राम माने, आकाश माने, नितीन राजे, अजित गायकवाड, सुमित गायकवाड, मयूर गुळवणी, राजूभाऊ जानकर यांच्यासह भाजप व आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



