आटपाडी (सांगली टुडे वृत्तसेवा): “प्रस्थापितांचे डावपेच उधळून लावत मी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेलो आहे. ही बँक आता मूठभर पुढाऱ्यांची राहणार नसून सामान्य शेतकऱ्यांची असेल. बँकेतील गैरकारभार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठीच मी बँकेत चाबूक घेऊन गेलो आहे,” असा सणसणीत इशारा जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आटपाडी तालुक्यातील झरे येथील मारुती मंदिर चौकात आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ८८ पैकी ५४ मते मिळवून २० मतांच्या फरकाने विजय मिळवल्याबद्दल झरे पंचक्रोशीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
२८५ कोटींचे कर्ज आणि बंद कारखान्यांवरून थेट सवाल
भाषणादरम्यान आमदार पडळकर यांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत मागील कारभारावर गंभीर आरोप केले. ११ हजार कोटींच्या ठेवी असलेल्या जिल्हा बँकेतील कर्जवाटप, रिकाम्या गोडाऊनवर साखरेच्या नावाखाली घेतलेली कर्जे आणि बनावट सोने तारण प्रकरणे यावर त्यांनी संताप व्यक्त केला. नवीन संचालक मंडळ येण्यापूर्वीच घाईघाईने घेतलेला २८५ कोटींच्या कर्जाचा निर्णय संशयास्पद असून, या सर्व प्रकरणांची चौकशी करून संबंधितांना जाब विचारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर आटपाडी, नागेवाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत येथील साखर कारखाने तसेच आटपाडी-विट्याच्या सूतगिरण्यांच्या दुरवस्थेला कोण जबाबदार आहे, असा सवालही त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यातील ६६ गावांना ७० टँकरद्वारे पाणीपुरवठा; जत तालुक्यात सर्वाधिक झळ, १.४३ लाख नागरिक बाधित.
तरुणांसाठी ५० लाखांपर्यंत कर्ज आणि स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय
बँकेकडून स्वतःसाठी एक रुपयाचेही कर्ज, भत्ता किंवा चहासुद्धा घेणार नसल्याचे सांगत पडळकर यांनी आगामी कामाची दिशा स्पष्ट केली. राजकीय शिफारस नसलेल्या सामान्य शेतकरी आणि तरुणांच्या हक्कासाठी आपण स्वतःच्या खर्चाने स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. होतकरू तरुणांना उद्योगासाठी बँकेमार्फत १० ते ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे, सांगलीत शिक्षणासाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना दरमहा १ हजार रुपये खोलीभाडे देणे आणि बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात १० ते १५ हजार रुपयांची वाढ करणे, हा आपला मुख्य अजेंडा असेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे काळेवाडी बुद्ध विहार, कुरुंदवाडी व झरे घाट यांसारखी कोट्यवधींची विकासकामे पूर्ण झाली आहेत. आगामी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टेंभू योजनेच्या आवर्तनातील पाण्याचा शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी मा. सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजप तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, ज्येष्ठ नेते चवरे, जिल्हा परिषद सदस्य माधवी पडळकर, आटपाडी नगराध्यक्ष यू. टी. जाधव, वैशाली कातुरे, दादासाहेब मोटे, सरपंच अंकुश पाटील हवालदार, महादेव पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: आता एजंटशिवाय घरबसल्या काढा ड्रायव्हिंग लायसन्स; ‘आपले सरकार’ने जाहीर केले अधिकृत दर आणि कागदपत्रांची यादी.



