ईश्वरपूर : शहरातील वाघवाडी रस्त्यालगत असलेल्या वृंदावन लॉजमध्ये सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केला. या कारवाईत लॉजचा व्यवस्थापक आणि दोन एजंटांना अटक करण्यात आली असून परराज्यातील एका युवतीची सुटका करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये लॉज व्यवस्थापक अभिजित बळवंत पाटील (वय 33, रा. संभाजी चौक, ईश्वरपूर), एजंट अमोल शामराव फार्णे (वय 35, रा. तिरंगा चौक, ईश्वरपूर) आणि परशुराम भास्कर हांडे (वय 30, रा. दत्तनगर, कामेरी रोड, ईश्वरपूर) यांचा समावेश आहे. न्यायालयाने शनिवारी तिघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सांगली पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला वृंदावन लॉजमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक जोतीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक ईश्वरपूर येथे दाखल झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून व्यवहाराची खात्री केली.
अवैध व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी छापा टाकून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी परराज्यातून आणलेल्या एका युवतीची सुटका करण्यात आली. कारवाईदरम्यान बोगस ग्राहकाने दिलेली रक्कम, संशयितांचे मोबाईल फोन आणि लॉजचे रजिस्टर जप्त करण्यात आले.
या प्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा गोडबोले यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










