सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) राज्यभरातील औषध विक्रेत्यांवर होत असलेल्या कडक कारवायांविरोधात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीविरोधात राज्यातील औषध विक्रेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, शासनाने तातडीने दखल न घेतल्यास राज्यभरात दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी सांगली येथे दिली.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यात तपासणी मोहीम सुरू आहे. मात्र, या मोहिमेअंतर्गत औषध विक्रेत्यांच्या अतिशय किरकोळ तांत्रिक चुकांसाठीही कठोर कारवाई केली जात असल्याचा आरोप संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. इतकेच नव्हे तर कारवाईविरोधात अपील करण्यासाठी असलेली कायदेशीर मुदतीची सवलतही काढून घेण्यात आल्याने विक्रेत्यांचा नैसर्गिक न्यायाचा हक्क नाकारला जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
एकीकडे किरकोळ कारणांवरून स्थानिक औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना, गंभीर गुन्हे करणाऱ्या डॉक्टरांकडे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑनलाइन औषध विक्रेत्यांकडे मात्र प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची टीका संघटनेने केली आहे. या अन्यायाविरोधात केमिस्ट असोसिएशनने राज्य शासनाला वेळोवेळी निवेदने आणि पत्रे पाठवून दाद मागितली, परंतु शासनाकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
शासनाच्या या दुर्लक्षाच्या निषेधार्थ संघटनेने आता आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. या आंदोलनांतर्गत टप्प्याटप्प्याने दुकाने पूर्णपणे बंद ठेवणे, दररोज केवळ आठ तासच दुकाने सुरू ठेवणे किंवा इतर तीव्र मार्गांनी निषेध नोंदवला जाणार आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य रुग्ण आणि नागरिकांची औषधांअभावी गैरसोय झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनावर राहील, असा थेट इशाराही सचिव अनिल नावंदर यांनी दिला आहे.



