सांगली : मिरज तालुक्यातील माधवनगर परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची घटना समोर आली आहे. परिसरातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि दीर्घकाळ प्रलंबित विकास कामांच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.
माधवनगरमधील अष्टविनायकनगर परिसरातील सुमारे 300 हून अधिक मतदारांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. रस्ते, गटारी, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत समस्या अनेक वर्षांपासून कायम असून, त्यावर ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागरिकांच्या बहिष्काराच्या निर्णयाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह परिसराला भेट दिली. यावेळी विकास कामांना मंजुरी मिळाल्याचे सांगत लवकरच कामे सुरू होतील, अशी ग्वाही देण्यात आली. मात्र, यापूर्वी मंजूर असलेलीच अनेक कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याचे सांगत नागरिकांनी मतदानावर बहिष्कार कायम ठेवला.
शनिवारी मतदानाच्या दिवशी सकाळपासून अष्टविनायकनगर परिसरातील लोक मतदानासाठी बाहेर पडलेले दिसून आले नाहीत. काही नागरिकांनी माध्यमांशी बोलताना गेल्या 10 ते 15 वर्षांपासून परिसरातील समस्या तशाच असल्याचे सांगितले. घरपट्टी व पाणीपट्टी भरूनही आवश्यक सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
मतदान करूनही मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने आमचा निषेध नोंदवण्यासाठी आम्हाला मतदानावर बहिष्कार टाकणे हा मार्ग स्वीकारावा लागत असल्याची भूमिका नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे मिरज तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावाचा मतदानावर बहिष्कार; सकाळपासून केले नाही एकानेही मतदान.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










