जत / सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): जत तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार, १८ नोव्हेंबर) सकाळी भिवर्गी येथील श्री बिळेणसिद्ध मंदिराच्या प्रांगणात संख अप्पर तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावांची महत्त्वपूर्ण प्रशासकीय आढावा बैठक पार पडली.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून जनावरांच्या चाऱ्याचीही मोठी अडचण जाणवत आहे. या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस जिल्हा व तालुक्यातील सर्व विभागांचे खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. संख मंडळातील विविध गावांचे सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच नागरिकांनी आपल्या गावातील पाणी, चारा आणि इतर मूलभूत अडचणी थेट प्रशासनासमोर मांडल्या. नागरिकांच्या या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
भिवर्गी येथील ही बैठक पूर्ण झाल्यानंतर जत तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावांसाठी जत येथील श्री यल्लाम्मा देवी मंदिराच्या प्रांगणात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जत मंडळातील सर्व सरपंच, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आपल्या गावातील अडचणी मांडण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



