सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): राज्यातील अनेक भागांत निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील संकटे लक्षात घेऊन सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधानपरिषद आमदार धैर्यशील कदम यांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आज १२ नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असून, कोणताही अनावश्यक खर्च, भव्य आयोजन किंवा सोहळा न करता अत्यंत साधेपणाने जनतेच्या भेटी घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी हार-तुरे, बुके, पुष्पगुच्छ किंवा कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू आणू नयेत, असे जाहीर आवाहन आमदार कदम यांनी केले आहे. केवळ नागरिकांचे प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वाद हेच आपल्यासाठी अनमोल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आज सकाळी ९ ते १० या वेळेत खटाव तालुक्यातील गोरेगाव (वांगी) येथे, तर दुपारी १२ वाजल्यापासून पुढे पुसेसावळी येथील जनसंपर्क कार्यालयात ते स्वतः उपस्थित राहून कार्यकर्ते आणि मतदारांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुके तसेच टंचाईग्रस्त भागातील प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेल्या या संवेदनशील निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून स्वागत होत आहे.



